काँग्रेसला मोठा धक्का ; १२ आमदार ‘या’ पक्षात करणार प्रवेश ?

हैद्राबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस सावरत असतानाच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेलंगणामध्ये १८ पैकी १२ आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. या आमदारांनी आपल्या गटाला तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात विलीन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अध्यक्षांकडे केली आहे.

तेलंगणामध्ये १२० आमदार आहेत. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत ८८ आमदार तेलंगणा राष्ट्र समितीचे आहेत तर १८ आमदार काँग्रेसचे आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष असून १२ आमदारांनी आपल्या गटाला तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलीन करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता तेलंगणामध्ये काँग्रेसचे फक्त ६ आमदार राहिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजापमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यांनंतर विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला धक्का दिला. विखे पाटील यांच्यासोबत ८ ते १० आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा असून यामुळे काँग्रेस तलंगणानंतर महाराष्ट्रात देखील मोठ्या संकटात सापडला आहे.