लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटलांसह १२ आमदार पक्षांतराच्या भूमिकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे याठिकाणी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी नवीन नेता निवडून आणण्याकरिता काँग्रेसकडून आज मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटलांसहित किमान १२ आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे लोकसभा निवडणुकानंतर काँग्रेसचे किमान १२ आमदार पक्षांतराच्या भूमिकेत आहेत की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्यामुळे नवा ट्विस्ट

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नवा नेता निवडीसाठी विधानभवनात काँग्रेस आमदारांची बैठक झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे देखील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात अद्यापही सुरु आहे. विखेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकांमध्ये देखील काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती काँग्रेस करीता चिंतेची बाब ठरू शकते असे बोलले जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे वारे हे भाजप आणि मोदींच्या दिशेने वाहू लागल्यामुळे आता काँग्रेसचे आणखी काही नेते पक्षांतर करणार का ? याबाबत राजकीय कट्ट्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

विखेंच्या जागी कोणाची लागणार वर्णी ?

नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वर्षा गायकवाड यांच्या नावांची प्रामुख्याने चर्चा आहे. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आशीष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षासाठी नवा नेता निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकुर, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे विधिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या नावाची घोषणा दिल्लीतूनच होईल हे स्पष्ट झाले आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसला नेता निवडावा लागेल. विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसवर नवा नेता निवडीची वेळ आली आहे.

You might also like