शिवसेना-राष्ट्रवादीच्या १२ कार्यकर्त्यांना अटक

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पालिकेने ऐरोली येथे बांधलेल्या मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरील व्हिडीओ चित्रफीत तपासून दोन्ही पक्षांच्या १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तसेच इतर सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार शुक्रवारी (दि.१) घडला होता.

कार्यकर्त्यांच्या झटापटीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. तसेच नाईक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी नाईक यांनी नगरसेवक एम.के. मढवी, करण मढवी व विनया मढवी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला. तर मढवी यांनी संदीप नाईक, अनंत सुतार आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे सात तर शिवसेनेच्या पाच जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात कोणत्याही महत्वाच्या पदाधिकाऱ्याला अद्याप अटक झालेली नाही. पुरावे गोळा करुन सहभागी असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यक्रमाचे चित्रीकरण केलेल्या व्हिडीओग्राफरकडून ते तपासले जात आहे. ज्यांच्याकडे घटनास्थळावरील व्हिडीओ आहेत, त्यांनी ते पोलिसांना द्यावे, असे आवाहन परिमंडळ १ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी केले आहे.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकावर दाखल गुन्ह्यातील ३०७ व ३५३ ही दोन कलमे वगळण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींवर कारवाई झाली नाही, तर लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.