दुर्देवी ! शिवनेरीवरून ‘शिवज्योत’ घेऊन परतणार्‍या 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन परतत असताना, प्रतीक उमेश शिंगोटे (वय-१२) याचा मृत्यू झाला आहे. प्रतीकच मृत्यू टेम्पोतून पडल्यामुळे झाला आहे अशी माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार पी. डी. दाते यांनी दिली. प्रतीक येडगाव येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत होता.

खामुंडी भागातील काही तरुण शिवजयंतीच्या शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते, त्यावेळी परतत असताना जुन्नर – बनकरफाटा रस्त्यावर कुमशेत फाटा येथे पिकअप टेम्पोतून प्रतीक खाली पडून गंभीर जखमी झाला. ओतूरमधील खासगी रुग्णालयात प्रतीकला दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताबाबत ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, नंतर गुन्हा जुन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दुर्घटनेची पुनरावृत्ती
१९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी एका तरुणीचा किल्ले हडसर च्या कड्यावरून पडून मृत्यू झाला होता. कड्यावरून खाली पडल्याने तिचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. तशीच दुर्देवी घटना गुरुवारी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.