पैश्यासाठी अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका

पिंपरी चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – शाळेतून घरी आल्यानंतर, दुकानात पेन घेण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीचे भरदिवसा अपहरण करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी अटक केली. तब्बल नऊ तास शोध घेऊन हिंजवडी जवळील नेरे गावातून मुलीची सुखरूप सुटका केली. या दोघांनी पैशासाठीच या मुलीचे अपहरण केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नितीन सत्यवान गजरमल (वय २५, देवगाव, ता. परंडा, जी. उसमनाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१, रा. थेरगाव, वाकड) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उद्योगनगर, चिंचवड येथिल क्वीन्सटाउन सोसायटी शेजारील एका दुकानासमोरून माही जैन निवासी हिचे अपहरण केले. काळ्या फिल्ममिंग असलेल्या कार मध्ये जबरदस्तीने घालून धूम ठोकली. यावेळी मुलीने आरडा ओरडा केल्याने दुकानदाराने पाठलाग केला होता. मात्र अपहरणकर्ते तिला घेऊन पळून गेले. याची माहिती मिळताच पोलीस खडबडून जागे झाले. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथके, इतर पोलीस ठाण्याची पथके तपासासाठी रवाना झाली.

‘त्या’ मुलीच्या सुटकेसाठी मागितली होती ५० लाखांची खंडणी

ठीक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, शहरातील लॉज तपासले गेले. याच सोबत वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू असताना पोलिसांना एक धागा सापडला.

अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांना आठ वाजता बोलावले आणि पैशाची (खंडणी) मागणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेऊन अतिशय हुशारीने त्या मुलीला ज्या ठिकाणी ठेवले होते ते ठिकाण शोधून काढले. संशयित आरोपीने तो राहत असलेल्या घरात तिला ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे दीडच्या सुमारास नेरे गावातुन त्या मुलीची सुखरूप सुटका केली आणि दोघांना अटक केली. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यातील एक आरोपी सिनेमा गृहात काम करतो तर दुसरा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. अधिकची माहिती पोलीस घेत आहेत.