बलात्काराला विरोध केल्यानंतर 12 वर्षीय मुलीच्या गुप्तांगात कात्रीनं भोसकलं, आतड्यांना गंभीर इजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या राजधानीत 2012 मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. बलात्काराला विरोध करणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर हल्ला करण्यात आला आहे. मुलीला कात्रीने भोकसल्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या या मुलीची प्रकृती चिंताजनक असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. हा प्रकार दिल्लीतील पश्चिम विहारमधील पीरा गरही परिसरात गुरुवारी घडला आहे.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. त्याला विरोध केल्याने आरोपीने तिच्यावर कात्रीने हल्ला केला. तिला वारंवार कात्रीने भोसकून जखमी केले. तिच्यावर सध्या दिल्ली एम्समध्ये उपचार सुरु असून पीडित मुलगी घरात एकटी असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांना आरोपीच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आहेत. यातून मुलीने आरोपीला बलात्कार करण्यास विरोध केल्याचे स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. त्याला यापूर्वीही वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तो तुरुंगात होता. मात्र, काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधार घेऊन जवळपास शंभर जणांची चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीची ओळख सांगितलेली नाही.

घटनेच्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. तो घरात चोरीच्या उद्देशाने गेला होता. घरात शिरल्यावर त्याला अल्पवयीन मुलगी दिसली. त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्याला प्रतिकार केल्याने आरोपीने तिच्यावर कात्रीने हल्ला केला. त्याने तिला अनेकवेळा भोसकलं. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगाला आणि आतड्यांना गंभीर इजा झाली. तसेच तिच्या डोक्याला दुकाखपत झाली. मुलीने बेशुद्ध होईपर्यंत आरोपीला प्रतिकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.