प्रहार अपंग संघटनेच्या ‘राहुटी’ दरबारात 120 तक्रार अर्ज दाखल

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चु कडू आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुटी जनता दरबार भरविण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी लेखी स्वरुपात दिल्या. पुरंदर तालुक्यासह इंदापूर, फलटण हवेली आदि तालुक्यातून तब्बल १२० अर्ज प्राप्त झाले. यामध्ये वारस नोंदी, ग्रामपंचायतचा ५ टक्के दिव्यांग निधी आदि अर्जांचा समावेश होता.

पाच टक्के निधी न खर्च केलेल्या २३ ग्रामपंचायती, १० अर्ज विद्युत महावितरण, १० अर्ज संजय गांधी, २५ अर्ज रेशनिंग कार्ड विभाग, अन्नधान्य सुरक्षेचा लाभ मिळणारी ४२ अर्ज, अनाथ व जातीचे दाखले साठी ५ अर्ज, माहिती अधिकारांविषयी १५ असे एकूण १२० लेखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्याच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, पदाधिकारी संभाजी महामुनी, फिरोज पठाण दत्तात्रय दगडे, संदीप जगताप, बाळासो शेवाळे, रेखा धुमाळ, उषा भिसे, दत्तात्रय पवार, निलेश कुदळे आधी अपंग विधवा महिला व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी यावेळी नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी समजून घेतल्या. तसेच त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. सर्व तक्रारी एकत्रित केल्यानंतर त्यांची छाननी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर निकाली काढल्या जातील. असे तहसीलदार सरनोबत यांनी सांगितले.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्याच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी सांगितले कि, सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाने लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा, संजय गांधी योजनेचा लाभ, रेशनिंग कार्ड तसेच ग्रामपंचायत दिव्यांग ५ टक्के निधी खर्च करण्यास आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात. यावेळी सुरेखा ढवळे, धर्मेंद्र सताव, संभाजी महामुनी आदि उपस्थित होते.