Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासांत 120 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आतापर्यंत 139 जणांचा मृत्यु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासात राज्यातील आणखी 120 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 13 हजार 716 वर पोहचली आहे. त्यापैकी 11 हजार 049 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या 139 इतकी झाली आहे. तर एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे.

राज्यात कोरोना बाधित पोलिसांमध्ये 1456 अधिकारी व 12 हजार 260 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकून पडलेल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक आहे. राज्यात आत्तापर्यंत 13 हजार 716 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2 हजार 528 अ‍ॅक्टिव्ह पोलीस असून त्यातील 331 अधिकारी आणि 2197 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत 11 हजार 049 पोलीस कर्मचाऱ्यांनी मात केली आहे. यामध्ये 9939 पोलीस कर्मचारी आणि 1110 पोलीस अधिकारी कोरोनामुक्त झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. पोलिसांमधील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनानं काही उपाययोजना आखल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांना ड्युटीनंतर दोन ते तीन दिवसांची सुट्टी देण्यात येत आहे. जेणेकरुन त्यांना आराम करण्यास वेळ मिळेल असे पोलीस दलातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.