1200 रुपयांना विकली जाते ‘ही’ भाजी, 2 दिवसांत होते खराब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुधा ही देशातील सर्वात महाग भाजी असेल. ही भाजी फक्त श्रावण महिन्यात विकली जाते. तेही फक्त झारखंड आणि छत्तीसगड या दोन राज्यांमधेच. या भाजीचे नाव दोन्ही ठिकाणी भिन्न आहे. खुखडी (Khukhadi) असे या भाजीचे नाव असून या भाजीची किंमत 1200 रुपये प्रति किलो आहे. बाजारात येताच ही भाजी हातोहात विकली जाते. या भाजीमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.

छत्तीसगडमध्ये या भाजीला खुखडी म्हणतात तर झारखंडमध्ये रुगडा म्हणतात. या दोन्ही मशरूमच्या प्रजाती आहेत. ही भाजी जंगलात नैसर्गिकरित्या वाढते. ही भाजी दोन दिवसांच्या आत शिजवून खावी लागते, अन्यथा ती निरुपयोगी होते. छत्तीसगडच्या बलरामपूर, सूरजपूर, सुरगुजासह उदयपूरला लागून असलेल्या कोरबा जिल्ह्याच्या जंगलात पावसाळ्याच्या दिवसात नैसर्गिकरित्या खुखडी भाजी उगवते.

दोन महिन्यांपर्यंत वाढणाऱ्या खुखरीची मागणी इतकी वाढते की जंगलात राहणारे ग्रामस्थ यास साठवून ठेवतात. छत्तीसगडमधील अंबिकापूरसह इतर शहरी भागात व्यापारी त्यास कमी किंमतीत विकत घेतात आणि ते 1000 ते 1200 रुपये प्रतिकिलोपर्यंत विकतात. हंगामात दररोज अंबिकापूर बाजारात सुमारे पाच क्विंटलपर्यंत या भाजीची आवक असते.

खुखडी ही खाल्ल्या जाणाऱ्या पांढर्‍या मशरूमचाच एक प्रकार आहे. खुकडीच्या अनेक प्रजाती व वाण आहेत. लांब देठाची सोरवा खुखडीला जास्त पसंती आहे. यास भूडू खुकडी असे देखील म्हणतात. भुडू म्हणजेच दीमकद्वारे मातीपासून बनविलेले घर किंवा टेकडी जिथे खुखडी पावसात वाढते. यामुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते.

पवित्र श्रावण महिन्यात झारखंडची मोठी लोकसंख्या महिनाभर चिकन आणि मटण खाणे बंद करते. अशा परिस्थितीत दुर्गम भागातून येणारी खुखडी हा चिकन आणि मटणाव्यतिरिक्त चांगला पर्याय ठरते. फक्त थोडासा खिसा जास्त मोकळा करावा लागतो. रांचीमध्ये ही भाजी प्रतिकिलो 700 ते 800 रुपये दराने विकली जाते. भाजीशिवाय औषध बनवण्यासाठी देखील खुखडीचा उपयोग होतो. असे म्हटले जाते की पावसाळ्यामध्ये वीज कोसळल्याने पृथ्वी फाटते. यावेळी, पृथ्वीच्या आतून पांढऱ्या रंगाची खुखडी बाहेर येते. गुरेढोरे पाळणाऱ्या मेंढपाळांना खुखडीची चांगली परख असते आणि हे कुठे सापडेल हेदेखील त्यांना ठाऊक असते.