Coronavirus : राजधानी दिल्लीतून दिलासादायक बातमी ! गेल्या 24 तासात नव्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा ‘कोरोना’तून बर्‍या झाल्यांची संख्या जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात 1246 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राजधानी दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 740 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 3411 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 1344 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्य़ंत 91 हजार 312 रुग्ण बरे झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत सध्या 19017 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दिल्लीत जुलैच्या पहिल्या 12 दिवसांत कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार 1 जुलै ते 12 जुलै दरम्यान दिल्लीत 25134 लोक संक्रमित झाले होते. तर 31640 लोक बरे झाले होते. तर 1 जुलै ते 6 जुलै दरम्यानचा अपवाद वगळता इतर दिवशी संक्रमित होणाऱ्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या जास्त आहे.