फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा, चौकशी समितीचा ठपका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहीमेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अधिवेशनात माजी वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करावी, अशी मागणी काही आमदारांनी केली होती. त्यानुसार नेमलेल्या चौकशी समितीने या मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला आहे. प्रत्यक्ष खर्च 3 हजार 688 कोटी झाला आहे. पण विधिमंडळामध्ये 2 हजार 438 कोटी खर्च दाखवला आहे. तसेच या मोहिमेसाठी 250 कोटी जाहिरातीवर खर्च झाला आहे. तसेच माहिती जनसंपर्क विभागात हे टेंडर रेकॉर्डवर नसल्याचेही समोर आले आहे. दरम्यान विधिमंडळ समितीची सोमवारी (दि. 22) बैठक होणार असून 16 आमदारांच्या समितीसमोर यावर चर्चा होणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात 33 कोटी वृक्षारोपण केले होते. राज्यात वर्ष 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लागवड केली होती. ऑक्टोबर 2020 अखेरीस त्यातील 75.63 टक्के रोपे म्हणजे 21 कोटी जिवंत आहेत, त्याची देखभाल करण्यात येत आहे. 2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था, उद्योगसमूह ,खासगी व्यक्ती यांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबवली. या मोहिमेसाठी 2 हजार 429.78 कोटी निधी मिळाला होता. तो पूर्ण वापरला होता. तरीही 25 टक्के रोप जिवंत का राहिली नाही याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनात केली होती. त्यावर वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी केली जाईल. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार होणार असून तो सादर केला जाई, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार अहवाल प्राप्त झाला असून त्यात 1250 कोटीचा घोटाळा झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.