YouTube वर व्हिडीओ पाहून केळीवाला बनला डॉक्टर, पोलिसांनी केला पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंटरनेट, युट्युबवरून डॉक्टरकी शोधून रुग्णालय थाटलेल्या एका 12 वी पास बोगस डॉक्टराचा नागपूर पोलिसांनी  पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रुग्णालयावर धाड टाकून केलेल्या कारवाईत स्टेअराईस, ऑक्सिजन सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा सापडला आहे. तसेच या डॉक्टराकडे गर्भपाताच्या गोळ्या देखील आढळल्या आहेत. धक्कादायक, म्हणजे हा डॉक्टर विद्यार्थ्यांसाठी नॅचरोपॅथीचे कोर्सेस पण घेत होता.

चंदन चौधरी असे पोलिसांनी अटक केलेल्या भामट्या डॉक्टराचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन चौधरी हा कधीकाळी बिहारवरून पळून नागपूरात आला होता. नागपुरात आल्यानंतर त्याने  केळी विक्रीला सुरुवात केली. त्यानंतर  त्याने इंटरनेटवरून डॉक्टरकी शोधली, बोगस डिग्री बनवून धर्मार्थ नावाने रुग्णालय थाटले.  रुग्णालय थाटल्यानंतर यूट्यूब आणि इंटरनेटवर बघून तो रुग्णाला इंजेक्शन देणे, सलाईन देणे,  औषध उपचार करायला शिकला. इतकेच नाही तर कोरोना काळात पीपीए किट घालून तो कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णावर देखील उपचार करू लागला. नवीन कामठी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या बोगस डॉक्टर रुग्णालयात धाड टाकून कारवाई केली. आरोपीने स्वतःचे MD BMS डॉक्टर असल्याचे शिक्के पण तयार केले होते. महत्वाचे म्हणजे या बोगस डॉक्टरला नव्याने तयार होणाऱ्या एका कोविड केअर सेंटरवर कॅन्सल्टंट बोलावणे आले होते.