पुण्यातील १२ वर्षीय मुलाची कौतुकास्पद कामगिरी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका १२ वर्षीय मुलाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पुण्यातील हाझिक काझी या मुलाने समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आणि समुद्रीय जीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने एका जहाजाचे डिझाईन तयार केले आहे. या जहाजाला त्याने  ‘एर्विस’ असे नाव दिले आहे.

खरेतर सागरी प्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे हजारो -लाखो टन प्लास्टिक कचरा समुद्राचे जनजीवन समुद्रीय अन्नसाखळी बिघडवत आहे. समुद्री मासे हे अन्नाचा स्रोत मानले जातात. पण वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे हे  प्लास्टिक समुद्रातील माशांकडून खाल्ले जाते आणि हेच मासे आपल्या ताटात येतात. त्यामुळे प्रदूषणाचा परिणाम माणसांवरच होतो. हेच लक्षात घेऊन पुण्यातील १२ वर्षीय मुलाने हे जहाजाचे डिझाईन तयार केले आहे.

एका वृत्त संस्थेशी बोलताना काझी म्हणाला, मी काही डॉक्यूमेंट्रीज बघितल्या, यानंतर कचऱ्याचा समुद्रीय प्राण्यांवर काय परिणाम होतो, हे माझ्या लक्षात आले. यासाठी मी काहीतरी करायला हवे, असे मला वाटले. आपण आपल्या दैनंदीन आहारात मासे खातो. मात्र तेच मासे समुद्रात प्लास्टिक खातात. परिणामी प्रदूषण थेट आपल्या पर्यंत येते. याचा मानवी जीवनावरही घातक परिणाम होतो. त्यामुळे मी या जहाजाचे डिझाइन तयार केली आहे.