लातूरमधील खळबळजनक घटना, झोपमोड केल्यामुळं 13 दिवसांच्या भाचीला मामानं बुडवून मारलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भाचीच्या सततच्या रडण्यामुळे लातूरमध्ये अवघ्या 13 दिवसांच्या भाचीची मामाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाची सतत रडते त्यामुळे झोपमोड होते या क्षुल्लक करणावरुन या चिमुकलीची ड्रममध्ये बुडवून हत्या केली. कृष्णा अंकुश शिंदे असे नराधम मामाचे नाव आहे.

लातूर जिल्ह्यातील झरी बुद्रुक या गावी माहेरी असलेली महिला येथे बाळंतपणासाठी आली होती. 13 दिवसांपूर्वी महिलेने मुलीला जन्म दिला. काही दिवसानंतर महिला सासरी हुडगे वाडिस जाणार होती. मात्र, त्यावेळी तिची नवजात मुलगी आढळून आली नाही. चिमुकली दिसत नाही म्हणून शोधाशोध सुरु करण्यात आली. बराच वेळ शोधल्यानंतर मुलगी घराच्या बाजूला पाण्याच्या ड्रममध्ये मृत अवस्थेत आढळून आली.

संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. याची माहिती तात्काळ चाकूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा माग काढला असता चिमुरडीचा 20 वर्षीय मामा कृष्णाने तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या सततच्या रडण्याने त्याची रात्री झोपमोड होत होती. या सध्या कारणामुळे त्याने हे कृत्य केले आहे. या प्रकारामुळे त्या चिमुकलीचे नातलग हादरुन गेले आहेत. चाकूर पोलीस आता पुढील तपास करत आहेत.