राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर भीषण अपघातात १३ ठार

मलकापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मलकापूर नॅशनल हायवे क्रमांक ६ वर भरधाव कंटेनर आणि टाटा मॅजिकच्या भीषण अपघातात १२ प्रवाशांसह चालक अशा १३ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. १२ प्रवाशांची क्षमता नसतानाही या वाहनात प्रवाशी कोंबलेले होते.

मुकुंद ढगे (वय ४०, अनुराबाद), छाया गजानन खडसे (वय ३७, रा. अनुराबाद), अशोक लहू फिरके (वय ५५, रा. अनुराबाद), नथ्थू वामन चौधरी (वय ४५, अनुराबाद), आरती, रेखा, सोयीबाई छगन शिवरकर ( वय २९, रा. नागझरी बहाणपूर), विरेन ब्रिजलाल मिळवतकर (वय ७, नागझरी बहाणपुर), सतीश छगन शिवरकर (वय ३), मीनाबाई बिलोलकर, किसन सुखदेव बोराडे, प्रकाश भारंबे (रा. जामनेर रोड भुसावळ), मेघा प्रकाश भारंबे असी १३ जण जागीच ठार झाले. तर गोकुल भालचंद्र भिलवसकर, छगन राजू शिवरकर (वय २६, नागझरी, जि. बुहाणपूर) अशी जखमींची नावे आहेत.

मलकापूर येथे नॅशनल हायवेवर रसोय कंपनीजवळ भऱधाव कंटेनर आणि टाटा मॅजिकची धडक झाली. दुपारी तीनच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या टाटा मॅजिकला कंटनेरने धडक दिल्याने यातील १२ प्रवाशांसह चालकही जागीच ठार झाला आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील दोन्ही वाहने रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरु केले. तर मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले.