Pune News : बर्ड फ्लू ! पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 13 कोंबड्या अन् 2 कावळ्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केरळ, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागांत त्याचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले. पुणे जिल्ह्यातील १३ कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर गुरुवारी दोन मृत कावळे आढळून आले. या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला का, याबद्दल पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

महाराष्ट्रात आजपर्यंत तीन हजार ३३८ विविध पक्षांचा मृत्यू झाला. लातूर ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५० आणि रायगड जिल्ह्यात ३ अशा एकूण ३३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील ३४, अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी १ बगळा, पोपट, चिमण्या आणि वर्धा येथे मोर अशा एकूण ४४ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. नाशिक, यवतमाळ, नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येकी एक, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी दोन, असे राज्यात एकूण सात कावळे मृत झाले आहेत.

या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहे. तपासणीचे निष्कर्ष येण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता, पशुसंवर्धन आयुक्तलयाने व्यक्त केली.