Coronavirus : राजधानी दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयातील 13 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : नवी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु असून आता सरंक्षित क्षेत्र म्हणून घोषित असलेल्या परिसरातही त्याने शिरकाव केला आहे.दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अनिल बैजल यांच्या कार्यालयात सुरुवातीला एकाचा कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे कार्यालयातील सर्वांची चाचणी घेण्यात आली. त्यात तब्बल १३ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे नायब राज्यपालांचे कार्यालय बंद करण्यात आले असून त्याचे निजंतुकीकरण हाती घेण्यात आले आहे.

दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच असून गेल्या २४ तासात दिल्लीत ९९० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत आतापर्यंत २० हजार ८३४ रुग्ण असून एकूण ५२३ जणांचा मृत्यु झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडु पाठोपाठ देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आहे.