अनुसूचित जमातींच्या ‘या’ 13 योजना धनगर समाजाला लागू, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या 13 योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध योजनेचे एकूण 7 शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उत्पन्नासाठी महिन्याभरात शासन निर्णय जाहीर करण्याचे आदेश मंत्री डॉ. संजय कुटे यांनी संबंधीत विभागाला दिले होते.

धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना
1. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.

2. राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.

3. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.

4. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त, मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.

5. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.

6. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.

7. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.

8. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.

9. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.

10. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.

11. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेंबर या 04 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर चराई अनुदान देणे.

12. भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

13. ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.