नागपुरातील समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांप्रकरणी 13 अधिकारी, कर्मचारी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या अनुषंगाने तत्कालीन सरकारने नागपूर येथील समता प्रतिष्ठानमार्फत आयोजित केलेल्या उपक्रमात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच संबधित अधिका-यांनी यासंदर्भातील काही माहिती कॅगपासून लपवल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रतिष्ठानमधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तसेच संबधित दोषी 13 अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करत असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी (दि. 3) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली आहे.

सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. समता प्रतिष्ठानमध्ये ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार असा सवाल प्रभूनी केला. त्यावर अंकेक्षण अहवालात साडेतीन कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. संस्थेला शासनाकडून दिलेल्या 16 कोेटींपैकी 14 कोटींच्या रक्कमेत घोटाळा झाल्याचा अंदाज आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून समितीचा अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी कॅगच्या अहवालात कुठलाही ठपका नाही ही बाब खरी आहे का, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच कॅगपासून अंकेक्षण अहवाल लपवून ठेवला होता, असे मुंडे म्हणाले. अधिकाऱ्यांची नावे घ्या, त्यांना निलंबित करा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा करतानाच प्रधान सचिवांच्या चौकशीत बार्टीचे तत्कालीन महासंचालक दोषी आढळले तरी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.