“मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते पण तसे झाले, ‘या’ राज्यात १३ तृतीयपंथी बनले कॉन्स्टेबल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगड पोलिसांनी १३ ट्रान्सजेंडर व्यक्तींना राज्यातील चार जिल्ह्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. छत्तीसगढ कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा निकाल सोमवारी लागला. दरम्यान, या १३ पैकी नऊजण रायपूर रेंजमधून भरती झाले होते आणि २० जण परीक्षेला बसले होते. “कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे निकाल लागले आहेत आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो.

आम्ही प्रथमच ट्रान्सजेंडर लोकांना कॉन्स्टेबल म्हणून भरती केले आहे आणि मी त्यांचे वैयक्तिक अभिनंदन करतो, “असे छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डीएम अवस्थी यांनी सांगितले. आतापर्यंत भारतात फक्त दोन ट्रान्सजेंडर पोलीस भरती करण्यात आले होते. एक तामिळनाडूमध्ये, दुसरा राजस्थानमध्ये. आता बिहार सरकारने अलीकडेच पोलीस दलात ट्रान्सजेंडर्स भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने पुरुष आणि महिलासमवेत ट्रान्सजेंडर समुदायाला तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांवर त्यांना समान विशेषाधिकार असल्याचा निर्णय दिला. २०१७ मध्ये छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्या भरती परीक्षेत तृतीय लिंग समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. अखेर २०१९ -२० मध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. रायपूर पोलिस मुख्यालय अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात एकूण २०३८ कॉन्स्टेबल भरती करण्यात आल्या असून त्यात १७३६ पुरुष, २८९ महिला आणि एकूण १३ ट्रान्सजेंडर लोकांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या किन्नर समाज आणि मितवा समितीने संधी दिल्याबद्दल छत्तीसगड सरकारचे आभार मानले आहेत. ट्रान्सजेंडर राईट्स एक्टिव्ह आणि मित वा समितीच्या अध्यक्षा विद्या राजपूत यांनी परीक्षेत निवड झालेल्यांचे अभिनंदन केले.

निवडलेल्या उमेदवारांना संधीबद्दल अभिमान…
“मी आज खूप आनंदी आहे … मला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. मी आणि माझे सर्व सहकारी यांनी या परीक्षेसाठी खूप परिश्रम घेतले. आमच्यासाठी ही एक दुर्मीळ संधी होती. ज्यामुळे आपले जीवन बदलू शकले, म्हणून प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम घेतले.
कृष्णा. तांडी, एक ट्रान्सजेंडर (ज्याची कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली)

आणखी एक यशस्वी उमेदवार कोमल साहूने तिला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस म्हणून संबोधले. ती म्हणाली, “मला कधीच सन्मानाची नोकरी मिळेल असे वाटले नव्हते. पण तसे झाले,” ती पुढे म्हणाली.