Thane News : फेसबुकवर मैत्री करून 13 महिलांची लाखोंची फसवणूक !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन –   फेसबुकवर आधी महिलांशी मैत्री करून स्वत:ची ओळख लपवून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या सतीश मोरे उर्फ शुभम पाटील उर्फ सोनू पाटील (36, रा. घणसोली) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं मंगळवारी अटक केली. आरोपीला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तपासात असं उघड झालं आहे की, त्यानं राज्यभरातील 13 महिलांची फसवणूक केली आहे.

सतीशनं फेसबुक अकाऊंटवर आकर्षक दिसणाऱ्या तरुणाचं छायाचित्र लावून कल्याणमधील एका 35 वर्षीय विवाहित महिलेशी मैत्री केली. यासाठी त्यानं शुभम पाटील नावाचा वापर केला. फेसबुकवर संवाद साधत त्यानं सदर महिलेकडून 3 लाख 19 हजारांची रक्कम ऑनलाईनद्वारे घेतली. महिलेची फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर 29 डिसेंबर 2020 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीअ‍ॅक्ट अंतर्गत तिनं तक्रार केली.

मालमत्ता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अंकुश शिंदे यांनी शुभम पाटील या नावानं फेसबुक अकाऊंट उघडणाऱ्या मोबाईल नंबरची माहिती काढली. यात असं समोर आलं की, हा मोबाईल घणसोली रेल्वे स्थानक परिसरातील आहे. इतकंच नाही तर हा मोबाईल सतीश मोरे याचा असून तो घणसोली स्थानक परिसरात फिरत असल्याचंही उघड झालं आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त एन टी कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, प्रदीप भोईर आणि जमादार श्यामराव कदम आदींच्या पथकानं फेब्रुवारी रोजी दुपारी वाजताच्या सुमारास घणसोली स्थानक सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं.

जेव्हा पोलिसांनी सतीशची चौकशी केली तेव्हा त्यानं फेसबुकवर शुभम पाटील आणि सोनू पाटील नावानं अकाऊंट सुरू केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आपण अशा प्रकारे 13 महिलांची 15 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची कबुलीही त्यानं दिली. तपासात याचाही खुलासा झाला की, स्वत:ची ओळख लपवून तो फेसबुकवर मैत्री केलेल्या महिलांशी संवाद साधत असे.

पोलीस कोठडीत रवानगी

कल्याण, भिवंडी, घाटकोपर, भांडुप, मुलूंड, वसई, महाड, भायखळा, नेरूळ, पुणे, अमरावती, सातारा आणि रत्नागिरी आदी परिसरातील महिलांची त्यानं अशाच प्रकारे गेल्या दोन वर्षात लाखो रुपयांची फसवणूक केल्याचंही उघड झालं आहे. त्याला 6 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयानं दिला आहे.