नियमांची पायमल्ली करत पर्यटक सहलीसाठी लोणावळयात, 131 जणांवर FIR

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं यंदाच्या वर्षी बंद ठेवण्यात आली आहे. या पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. असे असतानाही काही हौशी पर्यटकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत पर्यटनस्थीळावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत असल्याचे समोर आलं आहे.

अशातच काही अतिउत्साही पर्यटक शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. मात्र या पर्यटकांना वर्षा सहल चांगलीच महागात पडली आहे. या पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी विनापास 131 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर बंदी झुगारल्याप्रकरणी 51 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच विनामास्क आलेल्या 129 पर्यटकांकडून तब्बल 64 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लोणावळा, खंडाळा येथील पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली असतानाही पर्यटक नियमांचे उल्लंघन करून लोणावळा आणि खंडळा येथील पर्यटन स्थळावर जात आहेत. अशा अति उत्साही पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुळशी येथे गेलेल्या काही पर्यटकांवर पौड पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. हे पर्यटक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवासी होते. पौड पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून दंड वसूल केला आहे.