महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वाहिनी जेसीबीने तोडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी (दि. 2) सकाळी 11.33 वाजता बंद पडला. परिणामी महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला व त्याचा सुमारे दोन लाख वीजग्राहकांना फटका बसला.

पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ आदी सर्व पेठांचा मध्यवर्ती परिसर तसेच लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्याचे महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 70 टक्के भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.
दरम्यान 132 केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापारेषणकडून प्रयत्न सुरु झाले तरी या कामास 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 75 ते 80 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे काही परिसरात विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर नाईलाजास्तव 2 ते 3 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.

फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगाराचे पलायन ; पोलीसांची धावपळ 

याबाबत माहिती अशी, की पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात जलवाहिनी संबंधात पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे गेल्या 10 दिवसांपासून खोदकाम सुरु आहे. महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वाहिनीद्वारे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. ही भूमिगत वाहिनी या खोदकामात तोडली जाण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिकेला वीजवाहिनी असलेल्या भागात खोदकाम करू नये असे वारंवार सांगण्यात आले होते. भूमिगत वाहिनी असलेली जागाही दाखविण्यात आली होती. मात्र यानंतरही त्या जागेवार सुरु असलेल्या खोदकामात आज सकाळी 11.33 वाजता महापारेषणची 132 केव्ही वीजवाहिनी तोडण्यात आली, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली. त्यामुळे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला आणि पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला जॉईंट चेन्नईवरून तातडीने विमानाद्वारे मागविण्यात आला आहे. मात्र या दुरुस्तीकामाला सुमारे 8 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार आहे असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 75 ते 80 मेगावॉट विजेचे व्यवस्थापन करून येत्या आठवडाभर पुणे शहरातील सुमारे दोन लाख वीजग्राहकांना होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने भारनियमन टाळण्यासाठी किंवा त्याचा कालावधी कमीत कमी राहील यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या आठ दिवसांत या परिसरातील वीजग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार व कमीतकमी करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. विजेचा वापर कमी झाल्यास विजेचे भारव्यवस्थापन करणे सुलभ होईल व विस्कळीत झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत ठेवता येईल. परंतु काही भागात विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागल्यास महावितरण दिलगिर आहे व या आपात्कालिन परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.