देशातील 1.35 कोटी शेतकर्‍यांना अजूनही मिळाले नाहीत 2 हजार रूपये, मोदी सरकारकडून लवकरच मदतीची अपेक्षा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान शेतीकरी सन्मान योजनेचा अर्ज करुन सुद्धा देशातील तब्बल १.३५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. सादर केलेल्या अर्जात काहींनी गोंधळ केल्याने अनेकांचे व्हेरिफिकेशन झाले नाही. तर काही ठिकाणी या योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. म्हणून आता योग्य व्यक्तींच्या हातात पैसे पोहचण्यासाठी सरकारने व्हेरिफिकेशनचे काम सुरु केलं आहे.

देशभरातील १४.५ शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मोदी सरकारने ६००० रुपये देण्याबाबत घोषणा केली होती. त्यासाठी आतापर्यंत ११ कोटी ३४ लाख वैध अर्ज प्राप्त झाले आहेत. तर उत्तर प्रदेशातील ३५ लाख ३८ हजार ८२ शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून ७ लाख ९२ हजार ५८४ शेतकऱ्यांची माहिती सत्यापित होणे बाकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेशातील ७ लाख ३६ हजार २९२ शेतकऱ्यांचे अर्ज व्हेरिफिकेशनसाठी प्रलंबित आहेत.

ही चूक पडेल महागात

या योजनेतील अर्जदारांच्या नावात आणि बँक खात्याच्या माहितीमध्ये गडबड आहे.
बँक खात्यातील आणि अन्य कागदपत्रांवरील नावाचे स्पेलिंग चुकीचे आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक सिस्टीम त्यांचा अर्ज पास करत नाही. असेही काही जिल्हे आहेत ज्यांचे व्हेरिफिकेशन या कारणामुळे थांबलं आहे. ज्यावेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करेल तेव्हाच केंद्र सरकारकडून मदत पाठवली जाते.

अनेक ठिकाणी घोटाळे उघड

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ह्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या योजनेमध्ये देशात ठिकठिकाणी घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडू ते उत्तरप्रदेशातील बाराबंकी आणि मिर्झापूर या ठिकाणाहून मोठे घोटाळे समोर आले. युपीमधील बाराबंकी येथे अडीच लाख अपात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला असून, प्रशासनाकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तर सप्टेंबरमध्ये गाझीपूरमध्ये १.५ लाख बनावट शेतकऱ्यांची नाव रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत याप्रकरणी तामिळनाडूत ९६ कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ३४ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. एकूण १३ जिल्ह्यांमध्ये FIR दाखल केल्यानंतर ५२ लोकांना अटक करण्यात आली आहे.

अशी सुधारा तुमची चूक

यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम PM-Kisan Scheme या वेबसाइटवर जावे लागेल. तेथे गेल्यावर फार्मर कॉर्नरवर जात Edit Aadhaar Details वर क्लिक करा. तेथे तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल. तसेच साइटवर दिलेला कॅप्चा कोड सुद्धा टाकावा लागेल. नंतर सबमिट करुन तुम्ही तुमची चूक सुधारू शकता. ऑनलाइन माध्यमातून हे काम पूर्ण होईल. अधिक माहितीसाठी तुम्हाला कृषी अधिकारी किंवा लेखापालांशी संपर्क साधावा लागेल.