भारतीय जैन संघटनेकडून आयोजित परिषदेस देशभरातील 135 स्मार्ट गर्ल प्रशिक्षक आणि प्रमुखांची उपस्थिती

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जैन संघटनेच्या वतीने आयोजित केलेली ‘स्मार्ट गर्ल’च्या प्रशिक्षकांची राष्ट्रीय पातळीवरील परिषद रविवारी (ता. १५) वर्धमान प्रतिष्ठान येथे संपन्न झाली. परिषदेला देशभरातून १३५ स्मार्ट गर्ल प्रशिक्षक आणि स्मार्ट गर्ल राज्य प्रमुख उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, स्मार्ट गर्ल प्रमुख संजय सिंघी, संप्रति सिंघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय, परिषदेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रशिक्षकांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये मेघना जैन, अर्पित जैन, प्रतीक्षा राजानी, अभिषेक ओसवाल, अलका ओसवाल, पदमजैन, एस. पी. मालिनी, पंकज कोठारी, संगीता चोप्रा , दीपक पाटील , सुवर्णा कटारे, विकास गोलचा, कुशल बलदोटा या प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना स्मार्ट गर्ल प्रकल्प प्रमुख भारती चौहान म्हणाल्या, आजपर्यंत संस्थेच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून समाजातील ५० हजाराहून अधिक मुलींचे विनामोबदला प्रशिक्षण देऊन सक्षमीकरण करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या समस्यांवर मात करून त्यांचा मानसिक आणि भावनिक विकास करण्यासाठी भारतीय जैन संघटनेने २००८ मध्ये ‘’स्मार्ट गर्ल’’ या उपक्रमाची आखणी केली. किशोर वयातल्या मुलींनी आनंदी जीवन जगण्याची क्षमता वाढवून त्यांना सक्षम करणे हा ‘’स्मार्ट गर्ल’’ या प्रकल्पाचा उद्देश आहे. जैन कम्युनिटी व जिल्हा परिषदेच्या शाळांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येतो.

समाजाच्या विकासासाठी, उभारणीसाठी एकत्रित होऊन काम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जैन संघटना ही संस्था काम करत आहे. स्मार्ट गर्ल प्रकल्प प्रमुख भारती चौहान व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अमिता जैन यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या सीमा शिंदे यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/