रस्ते अपघातात शेकडो बळी घेणारे चालक फरारच

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. गेल्या 2 वर्षांत नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात तब्बल 1,334 अपघात झाले असून यात 503 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 137 जणांचा बळी घेणारे वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याने ते अद्यापही मोकाटच आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून अपघाताची शक्यता असल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांविषयी नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

अपघाताला कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती तसेच वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे हे अपघात घडत आहेत. अनेकदा अपघात करून वाहनचालक घटनास्थळावरून पसार होतात. त्यामुळे बहुतांश अपघातांचा उलगडा अद्याप झाला नाही. गेल्या दोन वर्षात सायन पनवेल मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, तसेच पामबीच व शहरांतर्गतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ते अपघाताच्या घटना घडल्या असून यात 503 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 232 जणांचा मृत्यू गतवर्षात झाला असून, 2019 मध्ये 271 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यापैकी 137 जणांचा बळी घेणारे वाहनचालक अद्यापही मोकाटच आहेत. त्यात 2020 मधील 78 तर 2019 मधील 59 अपघातांचा समावेश आहे.