13 वी अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धा पुण्यात, 600 खेळाडुंचा सहभाग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – १३ व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने पुण्यात करण्यात आले आहे. श्री. छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी आणि वडाचीवाडी फायरिंग रेंज येथे १३ ते १८ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून यामध्ये देशातील ६०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरुष व महिला गटातील सर्वोत्तम शूटर विजेत्यास वॉलथर एयर पिस्तूल परितोषक म्हणून देण्यात येणार आहे.

यावेळी सीआरपीएफचे निवृत्त महासंचालक टी. एस. धिल्लन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, विनायक ढाकणे, सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत २९ संघ १०, २५, ५० आणि ३०० मीटर एयर पिस्तूल गटातून खेळणार आहेत. बीएसएस इंदोरचे ५२, सीआरएफ दिल्लीचे ५७ आणि महाराष्ट्र टिमचे ३७ खेळाडू खेळणार असून महाराष्ट्र संघात पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील खेळाडू खेळणार आहेत.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस महासंचालक एस.के. जैस्वाल यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. यावेळी माजी पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन हेही उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोप १८ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच चंद्रो तोमर, प्रकाशी तोमर याही उपस्थित राहणार आहेत.

अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज अंजली भागवत या २५ मीटर एयर रायफल गटाचे तांत्रिक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. सुवर्ण व रौप्य पदक विजेते हिना सिद्धू, तेजस्विनी सावंत, अशोक पंडीत, सतीश शहा यांच्या हस्ते पदक वितरण करण्यात येणार आहेत.

पोलीस खात्यासाठी नेमबाजी स्पर्धा महत्वाची असून नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेसाठी ही स्पर्धा म्हटवाची आहे. खेळाडू पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी नागरिकांनी तसेच शिकाऊ नेमबाज खेळाडू यांनी स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन बिष्णोई यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/