Coronavirus : चिंताजनक ! पुण्यात 24 तासात रेकॉर्डब्रेक 14 ‘कोरोना’बाधितांचा मृत्यू तर 152 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 221 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये कमालीची वाढ झाले आहे. दरम्यान, पुण्यात आज दिवसभरात तब्बल 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नव्याने 152 रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळं 221 जणांचा बळी गेला आहे. लॉकडाऊन 4.0 मध्ये काही बाबींना सूट देण्यात आली असली तरी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.

पुण्यात रेकॉर्डब्रेक तब्बल 14 जणांचा एकाच दिवसात मृत्यू झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, उपचारानंतर कोरोनातून बर्‍या झालेल्या 113 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार घेणार्‍यांपैकी 165 रूग्ण क्रिटिकल असून त्यापैकी 43 रूग्णांना व्हेंटिलेटरवर उपचार देण्यात येत आहेत. पुण्यात एकुण 3899 कोरोनाबाधित असून त्यापैकी 1656 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आजपर्यंत तब्बल 2023 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. आवश्यक काम असल्यास बाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.