अबब ! श्रीरामपूर नगरपरिषदेत 14 कोटींचा घोटाळा, तत्कालीन नगराध्यक्षांसह 6 अधिकाऱ्यांविरुद्ध FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीरामपुर शहरातील गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर नगरपरिषद तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2015 -16 या आर्थिक वर्षात झालेल्या या घोटाळ्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजश्री ससाणे (तत्कालीन नगराध्यक्ष, श्रीरामपूर नगरपरिषद, रा.निरमे चौक वार्ड नं ३, श्रीरामपूर), सुमंत गणपतराव मोरे (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद, रा. हिंगणघाट, जि.वर्धा), संतोष महादेव खांडकर (तत्कालीन मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपरिषद), सूर्यकांत मोहन गवळी (बांधकाम अभियंता, श्रीरामपूर नगरपरिषद, श्रीरामपूर), राजेंन्द्र विजय सुतावणे (तत्कालीन बांधकाम अभियंता, श्रीरामपूर नगरपरिषद), ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग प्रा.जि.कोल्हापूर, मे.दहासहस्त्र सोल्युशन प्रा.लि. ठाणे वेस्ट यांचा समावेश आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ता केतन खोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेचे श्रीरामपूर शहर भुयारी गटार योजनेतील दक्षिणेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस.टी.पी पंपींग स्टेशनसाठी जागा उपलब्ध नसताना तसेच भुयारी योजनेतील उत्तरेकडील एस.टी.पी.चे सिव्हील वर्क पूर्ण हाेण्याअगोदरच आवश्यक असणाऱ्या मेकॅनिकल इलेक्ट्रीक्ल वर्कची बीले अदा केली. यातून श्रीरामपुरची जनता व शासनाची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केला आहे.