राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 14 नेत्यांची ‘गोची’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला गळती लागली. अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. सत्तेत पुन्हा भाजप-शिवसेना युती येणार असल्याचे निश्चित मानत या नेत्यांनी पक्षांतर केले. मात्र, सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता पक्षांतर केलेल्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील काही बड्या नेत्यांनी मोठ्या दिमाखात पक्षांतर करुन स्वपक्षाला धक्का देण्याचे काम केले. मात्र ते भाजप- शिवसेनेत गेले असले तरी दोन्ही पक्षांना सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या नेत्यांची परिस्थिती सध्या ‘न घर का ना घाट का’ अशी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, रश्मी बागल, नारायण राणे, दिलीप सोपल, संजय मामा शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, नमिता मुंदडा, संजय दिना पाटील, अवधुत तटकरे, राणा जगजितसिंह या सारख्या दिग्गज नेत्यांनी स्वपक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. कुणी सत्तेच्या लालसेपोटी, तर कुणी कारवाईतून वाचण्यासाठी सत्ता पक्षांचे झेंडे हाती घतले.

सध्याच्या परिस्थितीतमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याची चिन्हे दिसून येत असल्याने सत्तांतर केलेल्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. भाजपने मेगाभरतीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. पक्ष बदलून भाजपवासी झालेल्या नेत्यांना पक्षाकडून अनेक अपेक्षा होत्या. सत्तेत येणार असल्याची शाश्वती होती. मात्र, आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच काही नेते पुन्हा स्वग्रही परतण्याच्या वाटेवर आहेत. सत्तेत राहून आपली पोळी भाजून घेण्याच्या विचाराने पक्षांतर केलेल्या नेत्यांची सध्या गोची झाली असल्याचे दिसून येत आहे.

Visit : Policenama.com