यवतमाळ, भंडारा, नांदेड, पालघरमध्ये 14 जणांना ‘कोरोना’, जळगावमध्ये एकाचा मृत्यू

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरानंतर आता कोरोना राज्यातल्या छोट्या शहरांमध्ये तसेच गावागावांमध्ये पोहचला आहे. आज यवतमाळ, नांदेड, भंडारा आणि पालघरमध्ये एकूण १४ करोनाबाधित सापडले असून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यवतमाळच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी ११ जणांचे रिपोर्ट्स पॉझेटिव्ह आले आहे. काल सायंकाळी ५ तर आज पहाटे ६ वाजेपर्यंत एकूण ११ जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यामुळे आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६१वर पोहोचली आहे. हे सर्व जण पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क कॉन्टेक्टमधील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

भंडाऱ्यात सापडला पहिला कोरोनाबाधित
भंडाऱ्यात पहिलाच करोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील गराडा येथे नागपूरवरून गेलेली एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या गावात मरकजमधून आलेले काही लोक होते. ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली होती? याचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेच्या कुटुंबाला क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्‍हणून सील
नांदेड शहरात अबचलनगर भागातील ४४ वर्षीय करोना संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्‍हणून सील करण्यात आला आहे. या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येणार आहे. जनतेने घाबरुन न जाता, प्रशासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे आणि अत्‍यंत आवश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जळगावात एकाचा मृत्यू
अमळनेर येथे रविवारी रात्री ११ वाजता एका ६६ वर्षीय करोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या महिलेची प्राणज्योत मालवली. महिलेला २४ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अमळनेर शहरातील करोनाचा हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने पाच बळी गेले आहेत. या महिलेला हृदयविकार झाला होता. जिल्ह्यात १८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अमळनेरातील १३ रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.