भाजपचे 14-15 आमदार आमच्या संपर्कात, जयंत पाटलांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यप्रदेशात भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले असतानाच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. राज्यातील भाजपचे जवळपास १४-१५ आमदार हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत, मात्र आम्ही भाजपसारखा खोडसाळपणा करणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांनी मध्यप्रदेशातील ऑपरेशन लोटसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केला की भाजप सत्तेसाठी उतावीळ झालेली आहे. तसेच भाजपचे १४-१५ आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि या आमदारांशी आमचे चांगले संबंध असून आम्ही त्यांची कामे करणार आहोत. तथापि आत्ता त्यांची मानसिकता काय असेल हे आम्ही समजू शकतो असंही त्यांनी सांगितलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सध्याला भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असले तरी आम्ही त्यांना गळाला लावून घेणार नाहीत. कारण भाजप सत्तेत असताना भाजपने ज्या चुका केल्या आहेत त्या आम्हाला करायच्या नाहीत. कारण सरकार चालावं याच्यावर आमचा जास्त भर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान गेल्या ऑक्टोबर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून आणि मानापमानावरून नाट्य रंगल्यानंतर शिवसेनेने भाजपबरोबरची आपली २५ वर्षाची मैत्री तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसून समाधान मानावं लागलं होतं.