चार्जरच्या वायरने आठवीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- घरात कोणी नसतांना शालेय विद्यार्थ्याने चार्जरच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना औरंगाबाद शहरातील मयुरपार्क परिसरात घडली आहे.प्रद्युमन राजू हिवाळे(१४)असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो इंग्लीश मिडीयम शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत होता. लहान भाऊ क्लास वरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लहान भाऊ दुपारी शिकवणीला गेला होता, तर वडील कार्यालयात कामकाजासाठी गेले होते.आणि आई काही तासांपूर्वीच देव दर्शनासाठी गेली होती. आईने सोबत येण्याचा त्याला आग्रह केला मात्र अभ्यास जास्त असल्याचे कारण देत त्याने जाणे टाळले. लहान भाऊ शिकवणीवरून घरी परतला तेव्हा बराच वेळ दार वाजवूनही प्रद्युमनने दरवाजा न उघडल्याने तो घरमालकाकडे गेला. त्यांनी देखील बराच प्रयत्न केला मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडला. दरवाजा तोडताच  प्रद्युमनने गळफास घेतल्याचे समोर आले. शेजाऱ्यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबद माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रद्युमनला घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.