१४ वर्षीय मुलाला मामाची अमानुष मारहाण ; अप्पर पोलीस अधिक्षकांनी फोडली वाचा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – ३ वर्षांपुर्वी आई वडील दगावल्याने मामाकडे राहणार्‍या १४ वर्षीय मुलाला मामाने लोखंडी पाईपने मारहाण करत पाठीवर वळ काढले. दरम्यान या अमानुष मारहाणीला खुद्द अप्पर पोलीस अधिशक्षकांनीच वाचा फोडत फेजरपुरा पोलिसांच्या मदतीने चाईल्ड लाईन संस्थेने मुलाची सुटका केली.

पिडीत १४ वर्षीय मुलगा गुरुकुंज येथे शिक्षण घेतो. दरम्यान तो महिनाभरापूर्वी अमरावतीत आला आहे. अमरावतीत एका नातेवाईक महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी तो राहायला आला. दरम्यान या पोलीस उपनिरीक्षक महिला अकोला येथे कार्यरत आहेत. घऱी मुलाची आजी आणि दोन मामा राहतात. २४ मे रोजी साडेबाराच्या सुमारास धामणगावातील मामाने त्याला लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्फत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्ड लाइनला मिळाली. त्यांनी लागलीच त्याचे घर गाठले. त्यावेळी मुलाची आजी व मामा घरात होते. बराच वेळानंतर त्यांनी दार उघडले. मुलगा एसपी ऑफिससमोर लिंबू-सरबतच्या गाडीवर गेल्याचे सांगण्यात आले. परंतु अर्ध्या तासाने तो मुलगा घाबरलेल्या स्थितीत बाथरूममधून डोकावत असल्याचे दिसले. त्यानंतर तो केव्हा आला, याची माहिती नसल्याचे त्याचा मामा सांगू लागला. दरम्यान त्याची आजीदेखील उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यानंतर चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनी मुलाला बाहेर बोलावले. तेव्हा त्याने पाठीवर मारहाण करण्यात आल्याचे वळ दाखवले. तर आजी त्याला परत घरात घेऊन गेली. समन्वयक फाल्गुन पालकर यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक आसाराम चोरमेलेंना दिली. त्यांनी पोलीस व्हॅन पाठवून मुलाला आणले. आणि मामांची चौकशी केली. या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाल कल्याण समितीच्या परवानगीने त्याला शासकीय बालगृहात पाठविण्यात येईल. मुलाचे समुपदेश केले जाईल.

फाल्गुन पालकर, केंद्र समन्वयक चाइल्ड लाइनकडून माहिती मिळाली. प्राथमिक चौकशी करून याप्रकरणात मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. असे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

चाइल्ड लाइनशी संपर्क साधा
लहान मुलामुलींच्या छळाचे प्रकार कुठेही होत असतील तर त्याची माहिती चाइल्ड लाइनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधून द्यावी. असे आवाहन संचालक सूर्यकांत पाटील, सहायक संचालक प्रशांत घुलक्षे, केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, अजय देशमुख, शंकर वाघमारे, अमित कपूर यांनी केले आहे.