Coronavirus : नांदेड जिल्ह्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 141 नवीन रुग्ण तर 217 झाले बरे

नांदेड: पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात कोरोनाचे ढग दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कोरोना रुग्णांची संख्या थांबता थांबेना. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी मनपाने उशिरा का होईना औरंगाबाद पॅटर्न नांदेडमध्येही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादच्या धर्तीवर नांदेडमध्ये व्यावसायिक व दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना अँटीजन तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. दरम्यान जिल्ह्यात 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या आठवडाभरात तब्बल 1141 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून या आठवड्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी 150 च्या आसपास नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.

मागील 24 तासांमध्ये तब्बल 141 रुग्ण आढळले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या 3297 वर पोहचली आहे. आज 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 120 एवढी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना कोरोना रुग्णांची संख्या नांदेड शहराबरोबरच तालुक्यातही वेगाने वाढत आहेत. तालुक्यातील दररोज येणारा रुग्णांचा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे.

आज (रविवार) प्रशासनाला 1188 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1006 नमूने निगेटिव्ह आले आहेत तर 141 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत 62 रुग्ण आढळले आहेत तर अँटिजन टेस्ट किट्सद्वारे केलेल्या तपासणीत 79 बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 3297 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 1632 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 1528 आहेत. सध्या प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 286 एवढी आहे.

आठवड्यातील बाधित व बळींची संख्या
3 ऑगस्ट – 203 रुग्ण तर 04 जणांचा मृत्यू
4 ऑगस्ट- 137 रुग्ण तर 03 जणांचा मृत्यू
5 ऑगस्ट – 196 रुग्ण तर 06 जणांचा मृत्यू
6 ऑगस्ट – 168 रुग्ण तर 06 जणांचा मृत्यू
7 ऑगस्ट – 182 रुग्ण तर 05 जणांचा मृत्यू
8 ऑगस्ट – 114 रुग्ण तर 02 जणांचा मृत्यू
9 ऑगस्ट – 141 जणांचा मृत्यू 04 जणांचा मृत्यू
आठवड्यात एकूण 1141 रुग्ण आढळून आले तर 30 जणांचा मृत्यू झाला.