मुंबईत गेल्या 24 तासात 1411 नवीन ‘कोरोना’चे रुग्ण, 43 कोरोना बाधितांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 22 हजारावर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईमध्ये झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1411 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजाराच्या पुढे केली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजाराच्या वर गेली असून एकट्या मुंबईत कोरोनाचे 22663 रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत कोरनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 43 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील मृतांची संख्या 800 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्य़ंत वाढवला आहे.

मुंबईतील कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये गेल्या 24 तासात 26 नवे रुग्ण आढळून आल आहेत. धारावीत कोरोनाबाधितांची संख्या 1353 वर पोहचली आहे. धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने मुंबई महापालिकेने या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान राज्यात आज 2100 नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजाराच्या वर गेली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मंगळवारी एकाच दिवशी राज्यात 1200 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्याचा मृत्यूदर 3.2 टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्के असल्याचे टोपे यांनी सांगतले.