Coronavirus : मुंबईत 148 ‘वैद्यकीय’ कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण, ‘या’ हॉस्पीटलमधील 80 जणांना ‘लागण’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत जवळपास 148 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अद्याप तपासणीनंतर अनेकांचा अहवाल येणे बाकी आहे. वॉकहार्ट या रुग्णालयात 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह समोर आले असून हे सर्व येथील वैद्यकीय कर्मचारी आहेत. या रुग्णालयात आतापर्यंत 80 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अनेक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना

बॉम्बे रुग्णालयात दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत आणि ते दोघे रुग्णालयातील डॉक्टर आहेत. यामुळे या रुग्णालयातील कोरोनाबाधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या 12 वर पोहचली आहे. जसलोक रुग्णालयात 21 नवे रुग्ण समोर आले असून या सर्व नर्स आहेत. तर भाटिया रुग्णालयात एकूण 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

वॉकहार्ट रुग्णालयातील आकडा वाढतोय

वॉकहार्ट रुग्णालयातील 150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना 6 एप्रिल रोजी क्वारंटाइन करण्यात आले होते. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक 70 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला होता. या रुग्णाची देखभाल करणाऱ्या दोन नर्सला अगोदर कोरोना झाला आणि त्यानंतर हळू-हळू पसरला. यानंतर बीएमसीने हे रुग्णालय सील करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संखेत वाढ

शनिवारी राज्यातील कोरोनाबाधित 328 रुग्णांचे निदान झाले. यामध्ये एकट्या मुंबईत 284 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 हजार 690 वर पोहचली आहे. तर मुंबईत एकूण 2 हजार 268 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 216 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 126 जणांचा मृत्यू झाला आहे.