Coronavirus : राज्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 1495 नवे रूग्ण तर 54 जणांचा बळी, एकूण बाधित 26 हजारांच्या टप्प्यात तर आतापर्यंत 975 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असून देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 1495 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्हि रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजार 922 वर पोहचली आहे.


राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 54 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 975 झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 5547 झाली आहे.

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15747 वर पोहचली आहे. तर मुंबईतील 596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून धारावीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे.