Lockdown in Maharashtra : राज्यातील ‘या’ 15 जिल्हयांमध्ये 1 जून नंतरही कडक निर्बंध?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे १ जूननंतर या जिल्ह्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केला जाणार असल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले. दरम्यान, राज्यातील १५ जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. त्यांचे कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर या निकषांवर वर्गीकरण केले असून या ठिकाणी एक जूननंतरही कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेड झोनमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, वाशिम, गडचिरोली आणि उस्मानाबाद आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

१ जूनला सकाळी राज्यव्यापी लॉकडाऊन संपत असल्याने लॉकडाऊन वाढवायचा कि नाही यावर येत्या चार पाच दिवसात बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे व्यपाऱ्यानी १ जूनपासून दुकाने उघडण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट झाली आहे तेथे लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा विचार असल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले, रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये पुढील आठ्वड्यापर्यंत जर रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही. रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईनची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तेथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केले जाणार आहे. मुंबईत बाधितांची संख्या कमी होत असली तरी तूर्त पुढील १५ दिवस लोकल सर्वसामान्य लोकांसाठी खुली करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाबरोबरच आता ब्लॅक फंगसचा विळखा वाढत चालला आहे. त्यापाठोपाठ व्हाईट आणि यलो फंगसचा संसर्ग सुरू झाला. उत्तर प्रदेशात यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला असून ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा यलो फंगस अधिक धोकादायक असल्याने तज्ज्ञांनी सावध राहण्यास सांगितले आहे, अशी माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली.