इफ्को कंपनीत गॅस गळती ! दोघा अधिकार्‍यांचा मृत्यु, १५ कर्मचारी गंभीर जखमी

फुलपूर : अलाहबाद फुलपूर येथील इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि़) या कंपनीच्या कारखान्यात गॅस गळती झाल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. यामुळे तातडीने हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. ही गॅस गळती बंद करण्यात यश आले असल्याचे प्रयागराजचे पोलीस उपायुक्त भानूचंद्र गोस्वामी यांनी सांगितले आहे.

फुलपूर प्रकल्पातील अमोनिया गॅसची गळती झाली असून त्यात व्ही़ पी़ सिंह आणि अभयनंदन या दोन अधिकार्‍यांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. या अधिकार्‍यांबरोबरच या प्रकल्पात काम करणार्‍या १५ कर्मचार्‍यांना या वायूची बाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

इफ्कोच्या या प्रकल्पात युरियाचे उत्पादन करण्यात येते. गॅस गळती झाली त्यावेळी या प्रकल्पात १०० कर्मचारी काम करत होते. अचानक गॅस गळती झाल्याचे कंपनीत गोंधळ उडाला. अमोनिया गॅसच्या संपर्कात आलेले अनेक कर्मचारी खाली पडले. त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यातील तज्ञांनी तातडीने ही गॅस गळती रोखण्यात यश मिळविले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रयागराज येथून ४० किमी अंतरावर असलेला इफ्कोचा हा प्रकल्प आहे. आशिया खंडातील मोजक्या प्रकल्पात या प्रकल्पाची गणना होते. असे असतानाही येथे ही दुर्घटना घडली आहे. १९८४ मध्ये भोपाळ येथील union carbide कंपनीत गॅस गळती होऊन मोठा हाहाकार माजला होता़. सुदैवाने यावेळी अमोनिया वायूची गळती बंद करण्यास लवकर यश मिळाले़ त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.