भावाचे मित्र असल्याचे सांगून महिलेला मारहाण करून १५ लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भावाचे मित्र असल्याचे सांगत त्याने देण्यासाठी तुमच्या कडे ठेवलेले १५ लाख रुपये द्या असे म्हणत दोघांनी ते पैसे घेतले. परंतु महिलेने भावाला फोन करून सांगते म्हणताच दोघांनी महिलेचे तोंड दाबून तिला मारहाण करून पोबारा केला. हा प्रकार पुणे सातारा रस्त्यावरील आदीनाथ सोसायटीमध्ये मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा नहार (वय-४६,रा.सातारा रोड) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहा नहार या गृहिणी आहेत. त्यांचे पती आणि भाऊ हे व्यावसाय़िक आहेत. दरम्यान त्यांच्या भावाने त्यांच्याकडे व्यवसायातील एक पार्टी घरी येईल त्यांना पैसे दे असे म्हणून १५ लाख रुपय़े घरी ठेवले होते. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. यावेळी त्यांनी आम्ही तुमच्या भावाचे मित्र आहोत. त्यांनी तुमच्याकडे १५ लाख रुपये ठेवलेले आहेत.

ते घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. असे सांगितले. त्यानंतर महिलेला पैसे घेण्यासाठी येणारी व्यक्ती हीच असल्याचा विश्वास बसला आणि त्यांनी पैसे दिले. त्यानंतर त्यांनी भावाला फोन करून सांगते असे म्हणत फोन करण्यासाठी फोन हातात घेतला. त्यानंतर मात्र चोरट्यांनी त्यांच्या हातावर मारले आणि त्यांना जखमी केले. त्यावेळी त्यांनी महिलेचे तोंड दाबून त्यांना बेशुद्ध करत भींतीवर डोके आपटले.

आणि त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि पोबारा केला. यावेळी महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. फिर्यादी महिलेचे पती घरी आले तेव्हा झालेला सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.एस. राठोड करीत आहेत.

Loading...
You might also like