‘त्यांचा’ मोठा निर्णय : रिसेप्शन रद्द करून जवानांच्या कुटुंबियांना देणार १५ लाख

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी दहशतवादी हल्याचा निषेध करत शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना व्यक्‍त केली आहे. जाधव यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारोह रद्द केला आहे. तसेच त्यासाठी होणारा पंधरा लाखांचा खर्च शहिद जवानांच्या कुटुंबियांना देण्यासाठी ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव म्हणाले की, ‘स्वागत समारंभासाठी बुक केलेल्या हॉटल व्यवस्थापनाकडे बुकींग चार्जेस कपात करून उर्वरित रक्कम परत देण्याची मागणी केली आहे. स्वागत समारंभ रद्द करून ती रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देणार असल्याचे समजल्यावर त्यांनीही तयारी दर्शवली.’

भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचा मुलगा अभिषेक यांचा १३ फेब्रुवारीला ग्वाल्हेर येथे विवाह सोहळा पार पडला. यानंतर १७ फेब्रुवारीला या विवाहनिमित्त स्वागत समारंभ आयोजित केला होता. तर २० फेब्रुवारीला त्यांच्या मुळगावी वैजापूर तालुक्यातील शिऊर येथेही एक समारंभ होणार होता. हे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी खर्चाची रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतीय जवांनाच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला.

लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतीसाठीची रक्कम कुणाच्या नावे जमा करायची याची माहिती घेऊन धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.