गोंदियात ऑक्सिजनअभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

गोंदीया : पोलीसनामा ऑनलाइन –   ऑक्सिजन अभावी गोंदियाच्या सरकारी रुग्णालयातील 15 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पण, वेळीच नॉन कोव्हिड खासगी रुग्णालयांतून शक्य होणारा ऑक्सिजनचा साठा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने अडचण दूर झाल्याचे डॉ. मोहबे यांनी सांगितले.

गोंदियात गुरुवारी (दि.15) रात्री नऊच्या सुमारास अचानक ऑक्सिजन संपणार असल्याचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच याचवेळी काही रुग्ण दगावल्याचेही समोर आले. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने जीव गमावावा लागल्याचा आरोप काही नातेवाइकांनी केला. प्रशासनाने याबाबत माहिती देण्यास नकार दिला. मात्र गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात शुक्रवारी जिल्ह्यात नवे 578 कोरोना रुग्ण आढळले. तर 390 बरे झाल्याने त्यांना घरी सोडले. तर 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात डीसीएचसी केटीएस रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील प्रत्येकी 12 याप्रमाणे 24 रुग्णांचा समावेश आहे. 5 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दगावले आहेत. रुग्णांचा हा वाढीव आकडा ऑक्सिजनअभावामुळे असल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 310 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.