धक्कादायक…..हत्येच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड; १५ जण तब्यात

पाटणा: वृत्तसंस्था 
एका व्यक्तिची हत्या केल्याच्या संशयावरून जमावाने महिलेचे कपडे फाडून तिची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील भोजपुर जिल्ह्यात समोर आला आहे. या घटनेमुळे पाटना शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर सदर महिलेला अमानुष मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकरणात हालगर्जीपणाचा ठपका ठेवत पाटणा विभागाचे आयजी नैय्यर हसनैन खां यानी कडक कारवाई करत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 8 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.
पोलीस अधिकारी अवकाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवासापासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय विमलेश शाहा याचा मृतदेह सोमवारी सकाळी रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. त्यानंतर चिडलेल्या जमावाने या मृत्यूला जबाबदार धरत एका महिलेवर हल्ला केला. मृत शाहाच्या हत्येबाबत गावकऱ्यांना या महिलेवर संशय होता.
झुंडीने एकत्र आलेल्या जमावाने बेभान होत महिलेची धिंड काढण्याचे कृत्य केले. एवढेच नाही तर स्थानिक बाजारपेठेतील काही दुकानांनाही आगी लावल्या, तसेच जोरदार दगडफेक करत नागरिकांना मारहाण देखील केली. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, जमावाने आक्रमक होत मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेवरही दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी अातापर्यंत 15 लोकांना ताब्यात घेतलं आहे.  जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना हवेत गोळीबार करावा लागला.