खराब रक्त चढविल्याने ४ महिन्यांत १५ गर्भवती महिलांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन – तामिळनाडूत तीन सरकारी रुग्णालयांत खराब रक्त चढविले गेल्याने मागील ४ महिन्यांत जवळपास १५ गर्भवती महिलांचा मृत्यू झालेला आहे. प्राथमिक चौकशीत हे रक्त योग्य तापमानात संग्रहित करून ठेवण्यात आलेले होते, असे समोर आलेले आहे. तथापि, अनेक डॉक्टरांनी हे रक्त सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

धर्मपुरी, होसूर आणि कृष्णागिरी सरकारी दवाखान्यात रक्ताचे परीक्षण करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांना आणि अधिकाऱ्यांना खराब रक्त चढविल्याने गर्भवती महिलांचा मृत्यू झालेला असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक ठिकाणी रक्त चढविल्यानंतर काही मिनिटांतच महिलांना त्याच्या वाईट परिणामांचा सामना करावा लागला असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्रकरणी दोषी असलेल्या ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हेगारी कारवाईसोबतच अनुशासनात्मक कारवाईदेखील करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच नर्स आणि लॅब टेक्निशियनवर केसेस दाखल केल्या जाणार आहेत. यापूर्वी सरकारी दवाखान्यात रक्त चढविताना निष्काळजीपणा केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात एका गर्भवती महिलेला एचआयव्ही संक्रमित रक्त चढविले होते.