Coronavirus : सातार्‍यात कोरोनाबाधित कैद्यांच्या संपर्कातील 15 कैद्यांना दुसरीकडं हलवलं

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून गर्दीच्या ठिकाणी संसर्ग वेगाने वाढत आहे. अशीच घटना सातारा जिल्हा कारागृहात घडली आहे. कारागृहात कोरोना बाधित कैद्यांच्या संपर्कात आलेल्या 15 कैद्यांना पोलीस प्रशासनाने अज्ञात स्थळी हलवले आहे. सातारा जिल्हा कारागृहात पुण्यातील येरवडा कारागृहातून 46 कैदी वर्ग करण्यात आले होते. यातील नऊ  महिला व पुरुष कैद्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

कोरोना बाधितांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. यामुळे संबंधित  कैद्यांच्या संपर्कात आलेल्या 15 कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ  नये म्हणून त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. सातारा कारागृहात वर्ग झालेले सर्व कैदी सातारा व पुणे जिल्ह्यातील आहेत. जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरासह परिसरात व जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राज्यात आतापर्यंत 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय अनेक कैद्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सातार्‍यात पोलीस प्रशासनावर दबाव आहे. सातारा जिल्हा कारागृह शहराच्या मध्यवस्तीत आहे.यामुळे जिल्हा कारागृहातील कैद्यांना लागण झाल्याने प्रतिबंधित  क्षेत्र घोषित करण्यात आले होते.  दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून  जिल्हा कारागृहातून 15 कैदी अज्ञात स्थळी हलविण्यात आले. यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विभाग अधिकारी मिनाज मुल्ला व विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी कारागृहास भेट दिली होती. जिल्हा कारागृह मुख्य द्वार व परिसराची नाकेबंदी करत 15 पेठांची प्रशासनाने नाकेबंदी केली होती.