एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी ‘हा’ दावा करून भाजपची झोप उडवणार ?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपचे 15-16 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कारणामुळे आमदारांना तूर्तास पक्ष सोडण्यास अडचण असल्याची माहिती खडसे म्हणाले. ते मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या भागात नेतृत्व नसल्यानेच मी राष्ट्रवादीची निवड केल्याचेही स्पष्ट केलं.

एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर, आज मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्महाऊसवर काही वृत्तवाहिन्यांसह पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्ला चढवला. फडणविसांनी माझी बाजू वरिष्ठांजवळ चुकीची मांडल्याचा आरोप देखील केला. यावेळी खडसे यांनी सांगितले की, या प्रकरणात मी एकच बाजू मांडल्याचे फडणवीस आता म्हणत आहेत. उर्वरित बाजू ते वेळ आल्यानंतर सर्वांसमोर आणणार आहेत. पण मग गेली साडेचार वर्षे ते कुठे गेले होते. मी सातत्याने न्यायाची मागणी करत असताना, माझा गुन्हा काय, ते विचारत असताना त्यांनी चालढकल का केली ? असा सवाल देखील खडसे यांनी फडणवीसांना केला.

मला न्याय मिळत नसल्यानेच मी माझ्या समर्थकांशी चर्चा करुन अखेर पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासोबत 15 ते 16 माजी आमदार आहेत. ते उद्या मुंबईत येणार आहेत. काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत. पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण येत आहे. एवढ्या आमदारांनी राजीनामे दिले तर निवडणूक घेणे शक्य नाही, असे सूचक वक्तव्यही खडसे यांनी केले आहे.

म्हणून राष्ट्रवादीची निवड

राष्ट्रवादीला आमच्या भागात नेतृत्व नसल्यानेच मी राष्ट्रवादीची निवड केली. मला शिवसेना, काँग्रेसकडूनही ऑफर होतीच, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या बाबतीत पक्षाने घेतलेला सामूहिक निर्णय असेल म्हणून मी न्यायाची अपेक्षा करत होतो. एकेक विषयावर मी फडणवीस यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करत होतो. माझ्याबाबतीत जे काही घडले ते जनतेला माहिती आहे, असेही खडसे म्हणाले.