15 वर्षाचा मुलगा एकटा सोनसाखळी चोरांशी भिडला; गोळी लागल्याने जखमी

दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलावर गोळी झाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलाचे वय अवघे 15 वर्षे आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला आहे. शालीमार बाग परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा रोहित क्लब रोडवर सकाळी 7.30 वाजता नारळ विकत होता. त्यावेळी त्याच्या स्टॉलवर उभ्या एका व्यक्तीची दोन दुचाकीस्वारांनी साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली.
साखळी खेचून हे चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच रोहितने त्यांना अडवलं. त्यावेळी रोहित आणि त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत एक आरोपीने त्याच्यावर गोळी चालवली. ही गोळी रोहितच्या खांद्याला लागली. यात रोहित चांगलाच जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘आम्हाला सकाळी 8.30 वाजता रामबागमधून पीसीआर कॉल आला होता. रोहितमुळे चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला आणि त्यांनी रोहितवर गोळी झाडली. आम्ही सध्या साक्षीदारांचा जबाब नोंदवत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहोत’, अशी माहिती डीसीपी असलम खान यांनी दिली आहे.
‘जेव्हा रोहितने, आरोपी चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं तेव्हा त्याने लगेच प्रतिक्रिया दिली. त्याने चोरांवर उडी मारुन त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यामधील एका चोराने बंदूक बाहेर काढून गोळी चालवली’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
तसे तर रोहितचे वडिल पप्पू हे स्टॉलवर असतात. परंतु ते आजारी असल्याने काही दिवसांपासून रोहित स्टॉलवर काम करत होता. सकाळी 7 ते 10 दरम्यान तो नारळ विकतो आणि नंतर सरकारी शाळेत जातो असे रोहितच्या वडिलांकडून सांगण्यात आले आहे. रोहितच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी रोहितला खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केलं आहे.