Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात आणखी 151 पोलीस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 34 लाखांपेक्षाही पुढे गेली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखाच्यापुढे गेली आहे. राज्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धे समजल्या जाणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा अधिकच संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ संसर्गाचा नाहीतर कोरोनामुळे पोलिसांचा मृत्यू देखील होत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यभरात आणखी 151 पोलीस कोरोनाबाधित आढळले आहेत, तर पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 14 हजार 792 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरु असलेले 2 हजार 772 जण आहेत. आतापर्यंत राज्यात 11 हजार 867 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 153 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना बाधित पोलिसांपैकी 1 हजार 574 अधिकारी व 13 हजार 218 कर्मचारी यांचा समावेश आहे.

राज्यात सध्या 2 हजार 772 अॅक्टिव्ह असून त्यामध्ये 358 अधिकारी व 2 हजार 414 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या 11 हजार 867 पोलीसांमध्ये 1 हजार 201 अधिकारी आणि 10 हजार 666 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तरआतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 153 पोलिसांमध्ये 15 अधिकारी व 138 कर्मचारी यांचा समावेश आहे.