COVID-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ‘कोरोना’चे 150 हून जास्त ‘पॉझिटिव्ह’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सतत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीच हजारांच्या वर गेला आहे. काल 160 नवीन रुग्ण सापडले होते तर आज सलग दुसऱ्या दिवशी 157 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. चार दिवसांपूर्वी एका दिवसात 171 विक्रमी रुग्ण सापडले होते. आज 157 रुग्ण सापडल्यानंतर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2722 इतकी झाली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 115 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आतापर्यंत 1640 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त शहरामध्ये उपचार घेणारे पुणे आणि आसपासच्या परिसरातील 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 164 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 76 महिलांसह एकूण 157 रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या व्यतिरीक्त पुणे, हडपसर, मंगळवार पेठ, कोंढवा, चाकण आणि जुन्नर येथील 3 महिलांसह 6 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील 63 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर पिंपरी विशालनगर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत आढळून आलेल्या 2722 संक्रमित रुग्णापैकी 1640 पिंपरी चिंचवडमधील आणि 164 हद्दी बाहेरील रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान शहरातील रुग्णालयांमध्ये एकूण 1035 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.